सत्यगिरीचें
आरोहण
प्रकाशक
संजीवन
कार्यालय
श्रीअरविंद
आश्रम
पाँडिचेरी
- २
२१
फेब्रुवारी
१९८०
अनुवादक
कु. विमल
भिडे
किंमत १ रुपया
सरकारी
सवलतीच्या
दराचा कागद
वापरला आहे.
मुद्रक
नवज्योति
प्रेस
पाँडिचेरी
- २
सत्यागिरीचें
आरोहण
नांदी,
सात श्रेणी व उपसंहार
असलेलें
जीवनविषयक एक
नाटक
*
पात्रें
परोपकारवादी
निराशावादी
शास्त्रज्ञ
कलावंत
तीन
विद्यार्थी
प्रेमी
जोडपें
यती
दोन
साधक
*
नांदी --
कलावंताच्या
कलागृहांतील
प्राथमिक
बैठक.
आरोहणाच्या
सात श्रेणी,
सातवी
म्हणजेच शिखर.
उपसंहार
-- नूतन जगत्
नांदी
(कलावंताच्या कलागृहांत, संध्याकाळ, दिवेलागणीची वेळ. सत्यशोधनाची एकमेव उत्कंठा धरून एकत्रित झालेल्या व्यक्तींच्या लहानशा गटाची बैठक समाप्त होत आहे.)
उपस्थित
·
सद्भावनेनें प्रेरित झालेला परोपकारवादी.
·
आयुष्यांत निराशाच पदरीं आल्यानें या जगांत सौख्याची शक्यताच न पटणारा निराशावादी.
·
निसर्गांतील समस्या सोडवूं पहाणारा शास्त्रज्ञ.
·
अधिक सौंदर्यमय ध्येयाचीं स्वप्नें रंगविणारा कलावंत.
·
स्वत:वर नि अधिक चांगल्या जीवनावर श्रद्धा ठेवणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा एक गट (दोन मुलगे व एक मुलगी.)
·
मानवी प्रेमांत परिपूर्णता शोधणारें एक प्रेमी जोडपें.
·
सत्याच्या शोधार्थ सर्व तऱ्हेच्या कठोर तपस्यांस सिद्ध असणारा यती.
·
एकाच प्रकारच्या उत्कंठेनें प्रेरित झाल्यामुळें एकत्र आलेले व अनंतानें स्वीकार केल्यानें अनंताकडेच केवळ जे उन्मुख झाले आहेत असे दोन जीव.
(पडदा उघडतो)
कलावंत : माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या बैठकीचा शेवट होत आला आहे, आपणांस प्रत्यक्ष कार्यानिमित्त एकत्र आणणारा असा अखेरीचा ठराव करून, बैठक संपविण्यापूर्वीं मला पुन: एकदां आपणांस विचारावयाचें आहे कीं, प्रारंभीं केलेल्या निवेदनाखेरीज कोणास आणखी कांहीं बोलावयाचें आहे काय ?
परोपकारवादी : होय. मी पुनश्च एकवार घोषणा करतो कीं, माझें सर्व जीवन मानवोद्धारार्थ मी अर्पण केलें आहे. कैक वर्षांपासून मी ज्ञात नि शक्य असणाऱ्या सर्व मार्गांचा अवलंब केला, परंतु समाधानकारक यश न मिळाल्यानें माझी अशी खात्री झाली आहे कीं, सत्यवस्तु आहे तरी काय याचा शोध घेणें हाच माझे प्रयत्न सफल करणारा मार्ग आहे. जीवनाचा खरा अर्थ काय याची जाणीव झाल्याखेरीज लोकांना परिणामकारक रीतीनें तुम्ही काय मदत करूं शकणार ? तुम्ही योजित असलेले सर्व उपाय वरवरचे आहेत, रामबाण औषध नव्हे. सत्याची यथार्थ जाणीवच फक्त मानवी समाजास तारूं शकेल.
निराशावादी : आयुष्यांत मी विलक्षण दु:ख भोगलें. मला अनेक वेळां वैफल्याचा अनुभव आला, अत्यंत अन्याय सहन करावे लागले, तीव्र आधिव्याधींशीं सामना द्यावा लागला. माझा आतां कशावरच विश्वास नाहीं. मला कशाचीच आशा उरलेली नाहीं, ना जगाची, ना मनुष्य प्राण्याची. एकच आशा मात्र उरलेली आहे व ती ही कीं सत्यवस्तूचा शोध घेणें कदापि शक्य असेल, तर तेवढें करावें.
पहिला साधक : आपण सर्व एकत्रित झालेले दिसतो याचें कारण एका समान अभीप्सेनें आपणां सर्वांचें जीवन एका सूत्रांत गोवलें गेलें आहे. कोणत्या कामनिक किंवा भावनेच्याहि बंधनानें आपणांस बांधलेलें नसून, एकमेव प्रबल कर्तव्य आपल्या जीवनावर आज प्रभुत्व गाजवीत आहे; व तें म्हणजें सद्वस्तूचा शोध घेणें.
जोडप्यांतील एक प्रेमी : (साधकांकडे बोट दाखवून)या आपल्या दोन मित्रांच्या उलट आमचे आहे. आम्ही दोघे (प्रेयसीस जवळ घेऊन) एकमेकांसमवेत नि एकमेकांसाठीं जगत आहोंत; आमची एकच एक महत्त्वाकांक्षा म्हणजे पूर्ण एकात्मता अनुभवणें, दोन देहांत खेळणारा एक जीव बनणें, दोघांचाहि विचार एक, इच्छा एक, किंबहुना श्वासहि एक होणें, दोन हृदयांतील एक स्पंदन होऊन केवळ परस्परांच्या प्रेमानें, प्रेमामध्यें नि प्रेमासाठीं जगत असणें. हेंच प्रेमाचें पूर्ण सत्य शोधून तें जीवनांत उतरविण्यासाठीं आम्ही आमचें संपूर्ण जीवन वाहिलें आहे.
यती : मजसंबंधीं विचाराल तर सत्याप्रत जाणें इतकें सोपें असेल असें मला वाटत नाहीं. तिथें पोहोंचण्याची वाट बिकट, उंचच उंच चढणारी, मधून कडे तुटलेली असणार. त्यावर अनेक संकटें, धोके, धास्ती नि कितीतरी फसवे आभास असणार. त्या संकटांवर मात करण्यास अविचल इच्छाशक्ति नि पोलादी ज्ञानतंतू असायला पाहिजेत. म्हणूनच, माझ्यासमोर ठेवलेल्या उदात्त ध्येयास पात्र होण्यासाठीं, सर्व प्रकारचे योगयाग, भोगत्याग नि व्रतवैकल्यें करण्यास मी तयार आहे.
कलावंत : (इतरांकडे बघून) तुम्हांला तर नाहीं कांहीं बोलायचे राहिलें ? नाहीं. ठीक तर, आतां, आपणां सर्वांची चांगली एकवाक्यता झाली आहे. आतां आपण सर्व मिळूनच जाऊं या आणि सर्वांच्या प्रयत्नांनीं सत्याप्रत नेणाऱ्या या पवित्र पर्वताचें आरोहण करूं या. हें जिवापाड कठीण साहस तर खरंच पण करण्यासारखं मात्र आहे. कारण, एकदां आपण शिखरावर पोंचलों कीं
साक्षात् सत्यदर्शन झाल्यानें आपले सारे प्रश्न सहाजिकच सुटतील.
तर मग उद्यां त्या पर्वताच्या पायथ्याशीं आपण जमूं या आणि चढणीला प्रारंभ करूं या. बरं, नमस्ते.
(सर्वजण नमस्ते म्हणून निघून जातात.)
*
पहिला
टप्पा
(एक हिरवळीचें पठार. येथून खालच्या खोऱ्यामधल्या प्रदेशाचें पूर्ण दृश्य दिसत आहे. या पठारापर्यंत येणारा रस्ता आतांपर्यंत सोपा व रुंद होता, तो यापुढें एकाएकीं अरुंद होऊन अवाढव्य आणि खडकाळ डोंगरांच्या सुळक्यांच्या कडेकडेनें वेढे घेत घेत वर जात आहे.
सर्वजण एकत्र येतात. सर्वांच्या ठिकाणीं भरपूर शक्ति आणि उत्साह आहे. खोऱ्यांतील प्रदेशाचें ते विहंगावलोकन करतात. या ठिकाणीं परोपकारवादी हातानें खूण करून सर्वांस बोलावतो.)
परोपकारवादी : मित्रहो ! मी तुमच्याशीं कांहीं बोलूं इच्छितो. कांहीं अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मला तुमच्या समोर मांडावयाच्या आहेत.
(सर्वजण शांत होऊन लक्षपूर्वक ऐकायला लागतात.)
या पठारापर्यंत हा पर्वत आपण सर्वजण हसतखेळत चढलो. येथून आपण जीवनाकडे पाहून त्याच्या समस्या व मानवी दु:खदैन्याचें कारण अधिकच चांगल्या रीतीनें आकलन करूं शकतों. आपलें ज्ञान विशाल आणि खोल होऊन आपणांसमोरील प्रश्न सोडविण्यास आतां आपण समर्थ झालों आहोंत.
(सर्व स्तब्ध राहतात.)
... परंतु या ठिकाणीं आपण अशा एका वळणावर आहोंत कीं आतां कांही निर्णय घेणें आवश्यक आहे. यापुढें चढाव अधिक बांका आणि बिकट आहे. आणि विशेष म्हणजे आपण या पर्वताच्या दुसऱ्या बाजूस गेल्यानंतर हें खोरें आणि मनुष्यवस्ती आपल्या नजरेआड होईल. याचाच अर्थ असा कीं, त्यामुळें मीं अंगीकारलेल्या कार्याचा मला त्याग करावा लागणार आणि ‘मी मानवसेवा करीन’ या माझ्या प्रतिज्ञेचा मला भंग करावा लागणार. तुमच्याबरोबर रहाण्याचा आग्रह मला तुम्ही करूं नका. तुम्हांला सोडून देऊन मला कर्तव्योन्मुख झालें पाहिजे.
(तो उतरणीच्या मार्गाला लागतो. बाकी सर्वजण सखेद आश्चर्यानें एकमेकांकडे पाहतात.)
यती : गरीब बिचारा ! तो पहा खालीं चालला. कर्मासक्तीनें बिचारा पराजित झाला. बाह्य जगाच्या मायाजालांत नि देखाव्यांत फसला. परंतु आपला उत्साह कशानेंहि मंदावतां कामां नये. आपण आपल्या मार्गावर पुढेंपुढें चलूं या. आपल्याला ना विषाद ना आशंका. (ते पुन: वाट चालूं लागतात.)
*
दुसरा टप्पा
(मार्गावरील एक भाग. वाट अधिकाधिक चढणीची होत चालली आहे. ती काटकोनांत वळल्यामुळे तीं कुठें जात आहे हें दिसणें अशक्य झालें आहे. खालीं एका दाट शुभ्र ढगानें बाकीच्या जगाशीं संबंध तुटला गेला आहे.
सर्वजण कमीअधिक प्रसन्न मनानें चालले आहेत. फक्त निराशावादीच सर्वांच्या मागून कसाबसा रखडत येऊन पोहोंचतो, रस्त्याच्या कडेच्या एका उंचवट्यावर तो हातपाय गाळून बसतो. आपलें डोकें हातांत धरून तो तसाच स्तब्ध रहातो. तो आपल्या मागोमाग येत नाहीं असें पाहून, विद्यार्थ्यांपैकीं एकजण त्याच्या जवळ येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो.)
विद्यार्थी : काय राव, काय झालं तुम्हाला ? थकला तर नाहीं ?
निराशावादी : (त्याला हातानें दूर लोटल्यासारखें करून) ऊं हूं. मला सोडून द्या, राहूं दे मला एकटाच. बस्स झालं आतां ! हें सर्वथा अशक्य आहे.
विद्यार्थी : पण असं कां ? मी म्हणतो, जरासा उत्साह धरा कीं.
निराशावादी : नाहीं. नाहीं. पुन: सांगतो, मी पुढें येणार नाहीं. हें धाडस मूर्खपणाचें आणि अशक्य आहे. (खालील ढगाकडे बोट दाखवून) हं. तें बघ. मानवी जीवन आणि जग यांचा आणि आपला संबंध पार तुटला आहे. कांहीं कळून घ्यावें म्हटलें, तर कुठेंसुद्धां कांहीं साधन उरलेलं नाहीं, (काटकोन करून वळलेल्या वाटेकडे तो मागें पहातो.)... आणि तें पहा. आपणांला हें सुद्धां दिसूं शकत नाहीं कीं, आपण कुठे चाललों आहोंत. हा सगळा वेडेपणा किंवा भ्रम आहे, कदाचित् दोन्हीहि ! आणि शेवटीं, सत्य म्हणून कांहीं शोधण्याजोगी वस्तु तरी आहे कीं नाहीं कोण जाणें
! जग, जीवन हा एक बंदिस्त नरकच नव्हे काय, ज्यांत आपल्याला कायमचं कोंडून ठेवलं आहे ? तुम्हांला वाटलं तर तुम्ही चालूं लागा. मी मात्र आतां हलणार नाही. मला स्वत:ची फसवणूक करून घ्यायची इच्छा नाहीं.
(पुन: आपलें डोकें तो दोन्ही हातांनीं धरून बसतो. तो विद्यार्थी त्याचें मन वळविण्याची आशा सोडून, आपणांस दिरंगाई होऊं नये म्हणून त्याला तशाच निराशमग्न स्थितींत सोडून, चढण चढण्यासाठीं बाकीच्यांना जाऊन मिळतो.)
*
तिसरा टप्पा
(शास्त्रज्ञ व कलावंत एकमेकांत बोलत होते; म्हणून सर्वांच्या मागून येतात, त्यांचें आपसांतील संभाषण संपत आलें आहे.)
शास्त्रज्ञ : हां. तेंच तर मी सांगत होतो. आपण विशेष गंभीरपणें विचार न करतां या महत्कार्याला हात घातला.
कलावंत : खरंच. आतांपर्यंतचा आपला प्रवास व्यर्थच झाल्यासारखा वाटतो. असें नाहीं कीं, अत्यंत मनोवेधक अशा गोष्टीचें निरीक्षण आपण केलें नाहीं. पण परिणामाच्या दृष्टीनें कांहीं त्याचा फारसा उपयोग झाला नाहीं.
शास्त्रज्ञ : बरोबर बोललास. माझ्या कार्यपद्धतीच मला अधिक पसंत आहेत. कारण त्या बुद्धीला धरून आहेत, सतत केलेल्या प्रयोगांवर त्या आधारलेल्या आहेत. शिवाय, पुढील पाऊल टाकण्यापूर्वी, पहिलें पाऊल योग्य आहे कीं नाहीं याविषयीं मी स्वत:ची नेहमीं खात्री करून घेत असतो. आपल्या मित्रांना आपण बोलावूं या. मला वाटतें, त्यांच्याशीं विचार-विनिमय करावयाला पाहिजे. (हातानें खूण करून व हांक मारून तो इतरांस बोलावतो. ते जवळ आल्यावर त्यांना उद्देशून शास्त्रज्ञ पुन: बोलूं लागतो.) माझ्या प्रिय मित्रांनो, या मार्गावरील सोबत्यांनो ! जसजसे आपण जगापासून आणि जगाच्या सत्यापासून दूर दूर जात आहोंत तसतसे, अजाण बालकांसारखें आपण वागत आहोंत अशी माझी समजूत अधिकाधिक दृढ होत चालली आहे. ज्याचें शिखर आजपर्यंत कोणींहि गांठलेलें नाहीं असा हा दुर्गम पर्वत जर आपण चढून गेलों, तर आपण त्या सत्याप्रत पोहोंचूं असें आपणांस खरोखरी वाटलें आणि चढण्याच्या मार्गाविषयीं नीट माहिती करून न घेतांच आपण या मार्गावर पाऊल टाकलें. आपण वाट चुकलेलों नाहीं असें कोण सांगूं शकेल ? आपल्या अपेक्षेप्रमाणें आपल्याला फलप्राप्ति होईलच अशी तरी खात्री कोण देऊं शकेल ? मला आतां असें वाटूं लागलें आहे कीं, आपण अक्षम्य अशा अदूरदर्शीपणाचें वर्तन केलेलें असून आपल्या प्रयत्नांत कांहींच शास्त्रशुद्ध नाहीं. यामुळें मीं इथेंच थांबावयाचें ठरविलें आहे. मला याचा खेद वाटतो. तरीपण आपली मैत्री तशी कायमचीच राहील. अर्थात्, मी अशासाठींच येथें थांबावयाचें म्हणत आहें कीं, या समस्येचा प्रथम नीटपणें अभ्यास करून मग शक्यतर मार्गासंबंधींचा, ध्येयाप्रत नेणाऱ्या योग्य मार्गासंबंधींचा निर्वाळा देतां यावा. (थोडा वेळ थांबून.) शिवाय माझी अशी खात्री झाली आहे कीं, सृष्टीमधील एकाद्या लहानांत लहान वस्तूच्या घटकाचें रहस्य जरी मी शोधून काढूं शकलो, रस्त्यावरील या एखाद्या साध्या दगडाचेंच उदाहरण घ्या - तर जें सत्य आपण शोधूं पहात आहोंत तें त्यामुळें हस्तगत होईल. म्हणून मी येथेंच थांबतो. नमस्ते, भेटूं पुन: - हो, असें म्हणण्याचें कारण, मला अशी खात्री आहे कीं, तुम्ही माझ्याकडे व माझ्या शास्त्रशुद्ध पद्धतीकडे परत याल. अथवा मी ज्याच्या शोधांत आहे तें मला सांपडलें, तर मी त्याची शुभवार्ता निवेदन करण्यासाठीं तुम्हांस येऊन भेटेन.
कलावंत : मी देखील आपला निरोप घेण्याच्या विचारांत आहे. या आपल्या मित्राचीं व माझीं कारणें एकसारखीं नसलीं तरी तीं तितकींच सबळ आहेत. आपल्या या मनोवेधक चढणीमध्यें मला कांहीं अनुभव येऊन गेले. नव्या अशा सौंदर्याचा मला साक्षात्कार झाला; अथवा माझ्यामध्यें नूतन सौंदर्यदृष्टि निर्माण झाली म्हणाना. पण, त्याचबरोबर, माझ्या अनुभवांना मूर्त स्वरूप देण्याची, तीव्र व प्रबळ अशी निकड मला एकसारखी वाटूं लागली आहे. हेतु हा कीं, त्यापासून सर्वांनाच ज्ञानलाभ व्हावा आणि विशेषत: भौतिक जगावर त्यायोगें प्रकाश पडावा. तर आतां मोठ्या खेदानें मी तुम्हांला सोडणार आहे. माझ्या मनावरील नूतन संस्कारांना साकार करीपर्यंत, येथेंच मी रहाणार आहे. जें मला व्यक्त करावयाचें आहे तें केल्यावर, मी या आरोहरणांत तुमचा पुन: एकदां सहचर होईन व तुम्ही तोंवर जेथवर पोंचला असाल तेथें मी नवीन शोधासाठीं तुम्हांस येऊन मिळेन. बरं आहे. शुभास्ते पन्थान: !
(राहिलेले सर्व एकमेकांकडे जरा विचलित दृष्टीनें पहातात. नंतर ती तरुण विद्यार्थिनी आवेशानें बोलते.)
विद्यार्थिनी : त्यांत काय झालं, ज्याला जायचं त्याला जाऊं दे. प्रत्येकजण आपापल्या दैवगतीप्रमाणं चालतो आणि स्वत:च्या स्वभावधर्माप्रमाणें वागत असतो. आपल्या अंगीकृत कार्यापासून आपणांस कांहींहि परावृत्त करूं शकणार नहीं. आपण आपलें पुढें जाऊं या; न डगमगतां, न भितां, न कचरतां. आतां पुढें चला !
(शास्त्रज्ञ व कलावंत सोडून सर्वजण चालूं लागतात.)
*
चौथा टप्पा
(दोन साधक व यती हे तिघे मिळून, इतरांसाठीं न थांबतां, प्रत्येक पाऊल रोवीत, एकसारखे वरवर जात आहेत. स्वत:मध्येंच गर्क असलेलें तें प्रेमी जोडपें हातांत हात घालून, इतरांकडें लक्ष न देतां त्यांच्यामागून चाललें आहे. त्यांच्या जरा मागून ते तीन विद्यार्थी येतात व थांबतात. ते थकून गेलेले स्पष्टच दिसत आहेत.)
पहिला विद्यार्थी : काय गड्यांनो ! चढण्याची हौसच असेल तर ही घ्या चढण. कसला हा रस्ता ! एकसारखा वर वरच जातो आहे न थांबतां. श्वास घ्यायलासुद्धां उसंत मिळत नाहीं. मी तर बुवा थकत चाललो आहे.
विद्यार्थिनी : वा ! तूंहि आम्हांला सोडणार ? हें कांहीं बरें नव्हे, हं.
पहिला विद्यार्थी : तसें नव्हे, सोडण्याचा प्रश्न नाहीं; पण निदान थोडी विश्रांतीहि घेऊं नये कीं काय ? जरा दम घेण्यास क्षणभर बसलों तर -- जरा श्वास घेण्याइतकेंच, अधिक नाहीं; आणि हे पाय तर अस्से दुखताहेत ! पहा तर, विश्रांति घेतल्यानंतर आपल्याला कसें अधिक जोमानें चढतां येईल ! माझे ऐका, थोडे समंजस व्हा, क्षणभर आपण टेकूं या; अगदीं क्षणभरच. पुन: चढणीला सुरुवात करूं तेव्हां, आपल्याला अधिक तकवा आलेला तुम्हांला दिसेलच.
दुसरा विद्यार्थी : ठीक आहे. आम्ही तुला एकट्यालाच कुडकुडत ठेवून जाणार नाहीं. शिवाय, मीहि थोडा थकलों आहेच. आपण एकत्रच बसूं या व आपण काय शिकलों, काय पाहिलें हें एकमेकांस सांगूं या.
विद्यार्थिनी : (क्षणभर घुटमळल्यानंतर तीहि खालीं बसते.) तसं कां होईना. तुम्हाला इथेंच टाकून जाण्याची माझी इच्छा नाहीं. पण आपण जास्त वेळ थांबतां कामां नये. वाटेंत रेंगाळणें हें नेहमींच धोक्याचें असतें.
(प्रेमी जोडपें मागें पहातें व त्यांना बसलेलें पाहून पुढें जातें.)
*
पांचवा टप्पा
(उंची खूप वाढली आहे हें स्पष्टच दिसत आहे. वाट अधिक अरुंद झालेली आहे व येथून विस्तृत क्षितिज दृष्टिपथांत येत आहे. खालील दरी मात्र दाट, पांढऱ्या शुभ्र ढगानें एकसारखी नजरेआड राहिली आहे. डाव्या बाजूस, वाटेच्या थोड्या मागच्या बाजूस एक लहानसें घर आहे; त्यासमोर बरेंच मोकळें आवार आहे. पहिले तिघेजण न थांबतां पुढें जातात. परस्परांच्या स्वप्न-सृष्टींत रमलेलें, एकमेकांना बाहुपाशांत घेतलेलें तें प्रेमी जोडपें नंतर येतें.)
तरुणी : (आपण एकटेंच आहोंत असें पाहून) अरे, इथें दुसरें कोणीच नाहीं, आपणच दोघे काय ते ! इतरांशी आपल्याला काय करायचें, आपल्याला त्यांची गरज नाहीं. एकमेकांच्या सहवासांत आपण पूर्ण आनंदी आहोंत, नाहीं कां ?
तरुण : (रस्त्याच्या बाजूला असलेलें घर पाहून) प्रिये, तें बघ त्या टेकडीच्या बाजूचें तें घर. एकटेंच, जणुं आपलेंच, आपल्या स्वागतास तयार; असीम दिक्प्रांत दिसूं शकेल असें. जणुं खास आपणां दोघांसाठींच बांधून ठेवलें आहे. आपणांस याहून अधिक तें काय हवें ? आपल्या मीलनाच्या दृष्टीनें सर्वस्वीं सुरक्षित असें हें आदर्श स्थळ आहे. कारण आपण दोघांनीं मिळून सर्वांगीण, परिपूर्ण मीलन अनुभवलें आहे; नि तें छायारहित व निरभ्र नभासारखें आहे. आपण बाकीच्यांना सोडून देऊं. नेहमींच समस्यारूप असलेल्या सत्याप्रत चढूं देत त्यांना. आपलें, आपल्यापुरतें सत्य आपणांस सांपडलें आहे, व तेवढें आपणांस पुरेसें आहे.
तरुणी : प्रियकरा, होय खरंच, आपण त्या घराकडे जाऊं या नि तेथेंच राहूं या. दुसऱ्या कशाचाच विचार न करतां आपण आपल्या प्रेमाची माधुरी अनुभवत राहूं या.
(सारखे एकमेकांना बाहुपाशांत धरून, रस्ता सोडून ते घराच्या दिशेनें वळतात.)
*
सहावा टप्पा
(शेवटीं रस्ता अत्यंत अरुंद होऊन एका अवाढव्य खडकाशीं एकदम थांबतो. तो खडक उभ्या भिंतीसारखा उंचच उंच आकाशांत गेलेला असून, त्याचें शिखर दिसूं शकत नाहीं. डाव्या बाजूस एक लहानसें पठार असून, त्याच्या पलीकडच्या बाजूस एक चिमुकली झोंपडी दिसत आहे. ठिकाण निर्जन व रुक्ष आहे. उरलेले तिघेजण बरोबरच येतात. परंतु यती एकदम थांबतो आणि दुसऱ्या दोघांना खुणेनें थांबवितो.)
यती : मला तुम्हांला कांहीं महत्त्वाचें सांगावयाचें आहे. कृपाकरून तुम्ही दोघे ऐकून घ्याल कां ? आपल्या या आरोहणांत माझ्या आत्मतत्त्वाचा मला साक्षात्कार झाला आहे; शाश्वताशीं माझें तादात्म्य झालें आहे. माझ्या दृष्टीनें त्याखेरीज इतर कशालाहि आतां अस्तित्व उरलेलें नाहीं व इतर कशाची गरजहि मला उरलेली नाहीं. त्या शाश्वत तत्त्वाखेरीज इतर सर्व अर्थशून्य भ्रम आहे. म्हणून मला वाटतें, या मार्गाचा शेवट मीं गांठला आहे. (डावीकडील पठाराकडे अंगुलिनिर्देश करून) नेमकें तिथेंच माझे उर्वरित आयुष्य कंठण्यास अगदीं अनुरुप असे उन्नत नि निवांत स्थळ आहे. जगापासून नि जनसमूहापासून दूर किंबहुना शेवटीं जीवनाच्या आवश्यकतेपासूनहि मुक्त अशा पूर्ण चिंतनमग्न अवस्थेंत मी तेथें राहीन.
(जास्त कांहीं न बोलता, निरोप न घेतां, मागें वळून देखील न बघतां, तो स्वत:च्या व्यैयक्तिक ध्येयप्राप्तीकरितां तडक निघून जातो.)
(आतां दोघे साधकच तेवढे मागें राहतात. त्या उदात्त वर्तनाचा मनावर कांहींसा परिणाम होऊन ते एकमेकांकडे पाहूं लागतात; पण लगेच ते स्वत:ला सांवरतात. मग ती साधिका उद्गारतें.)
तरुण साधिका : नाहीं ! तें सत्य, तें संपूर्ण सत्य असणें शक्य नाहीं. अखिल विश्वाची निर्मिती म्हणजे निव्वळ भ्रम असून, तिचा आपणांस केवळ त्यागच केला पाहिजे असें असणें शक्यच नाहीं. शिवाय, आपण अजून पर्वताच्या शिखरावर येऊन पोचलेलों नाहीं, आपलें आरोहण अजून समाप्त झालें नाहीं.
तरुण साधक : (खडकाच्या त्या भिंतीजवळ काटकोनी रेषेंत वर जाणाऱ्या वाटेच्या शेवटाकडे बोट दाखवून) पण रुळलेला रस्ता आतां येथें थांबत आहे. याच्याहून वर कोणी मानवप्राणी गेल्याचें दिसत नाहीं. या आपल्यासमोर उभ्या असलेल्या व दुर्गम भासणाऱ्या कड्यावर चढून जाण्याचीं साधनें आपलीं आपणालाच शोधून काढलीं पाहिजेत. आपली इच्छाशक्ति आणि आपली श्रद्धा याखेरीज अन्य कांहींच मार्गदर्शन किंवा मदत नसतांना केवळ स्व-प्रयत्नांनींच पायरीपायरीनें आपणांस पुढें जावें लागणार. बहुधा आपला रस्ताहि आपणांसच खणून तयार करावा लागेल.
तरुण साधिका : (उत्कटतेनें)
हरकत नाहीं ! आपण पुढें पुढेंच जाऊं या. आपण शोधून काढण्याजोगें कांहींतरी निश्चित वर आहेच. या सृष्टीला कांहीं अर्थ आहे आणि तो आपल्याला शोधून काढावयाचा आहे.
(ते पुन: चालावयास सुरुवात करतात.)
*
सातवा टप्पा
शिखर
(ते दोघे अभीप्सु साधक अनेक संकटांना धैर्यानें तोंड देऊन, महत्प्रयासानें शेवटीं शिखरावरील पूर्ण प्रकाशांत येऊन पोंचतात. येथें शिखराच्या खडकाखेरीज सर्व प्रकाशच प्रकाश आहे. ज्या खडकावर ते उभे आहेत तो, त्यांचीं चार पावलें कशीबशीं मावतील एवढाच आहे.)
तरुण साधक : शेवटीं एकदां या उत्तुंग शिखरावर आलों आपण ! येथें हिरण्मय तेज:पुंज सत्यच काय तें उरलें आहे. दुसरें कांहींहि नाहीं.
तरुण साधिका : इतर सर्वच दिसेनासें झालें आहे; ज्या मार्गावरून आपण इतक्या कष्टानें वर चढलो त्या मार्गावरील आपल्या पावलांच्या खुणाहि पुसून गेल्या आहेत.
तरुण साधक : पुढें, मागें, सर्वत्र पोकळीच पोकळी. आपलीं पावलें ठेवण्यापुरतीच जागा आहे. त्या शिवाय कुठेंच कांहींच नाहीं.
तरुण साधिका : आतां कुठें जाणार ? काय करणार ?
तरुण साधक : एकच एक सत्य सभोंवार सर्वत्र आहे.
तरुण साधिका : पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठीं आपण याहि पुढें गेलें पाहिजे; आणि त्यासाठीं दुसरें एकादें रहस्य शोधून काढायला पाहिजे.
तरुण साधक : वैयक्तिक प्रयत्नांची शक्यता येथें संपली आहे हें उघड आहे. अन्य कोणत्या तरी शक्तीनेंच साह्यार्थ आलें पाहिजे.
तरुण साधिका : कृपा, केवळ भगवत्कृपाच कांहीं करूं शकेल. तीच एक रस्ता दाखवूं शकेल. तीच चमत्कार घडवून आणील.
तरुण साधक : (क्षितिजाकडे हात पसरून) पहा, पहा, तिकडे अगदीं दूर, अगाध दरीच्या पलीकडे एक तेज:पुंज शिखर दिसत आहे. तेथील सर्वांगसुंदर आकारांकडे, विस्मयजनक सुसंबद्धतेकडे, आश्वासित भूमीकडे, नूतन जगताकडे पहा.
तरुण साधिका : खरंच ! तें तिथें आहे. तिथें आपणांस गेलंच पाहिजे. पण कसें ?
तरुण साधक : ज्या अर्थीं तें तिथें आहे, त्या अर्थीं आपणांस तेथें गेलेंच पाहिजे. त्याचीं साधनेंहि आपणांस दिलीं जातील.
तरुण साधिका : निश्चित ! आपल्यामध्यें आत्यंतिक श्रद्धा, भगवत्कृपेवरील नि:स्सीम भरंवसा व ईश्वराच्या ठिकाणीं पूर्ण शरणभाव असला पाहिजे.
तरुण साधक : होय, भगवंताच्या इच्छेला सर्वस्वीं नि:शेष आत्मसमर्पण झालें पाहिजे. सर्व दृश्य मार्ग नाहींसें झाले असल्या कारणानें आपण निर्भयपणें, मन द्विधा होऊं न देतां, परमेश्वरावर पूर्ण भरंवसा टाकून उडी घेतली पाहिजे.
तरुण साधिका : आणि जेथें आपणास जावयाचें आहे तेथें आपणांस नेलें जाईलच.
(दोघे उडी टाकतात.)
*
उपसंहार
सत्याचा साक्षात्कार
(अद्भुत प्रकाशाची भूमि)
तरुण साधक : आलो येथे आपण ! अदृश्य पंखांवरून एका दिव्य आश्चर्यकारक शक्तीनें आपल्याला येथें आणलें आहे.
तरुण साधिका : (सभोंवार पहात) काय हें अद्भूत तेज ! आतां हे नवजीवन जगण्यास शिकावयाचेंच केवळ उरलें आहे.
(पडदा पडतो.)
**